Saturday, June 25, 2016

हृदयाच्या तालावर

प्रेम कधीही करावं कुणावर,
बेछूट, बेफाम हृदयाच्या तालावर......

ओसंडून वाहणाऱ्या पाण्यावर,
अन थैमान घालणाऱ्या वाऱ्यावर.
पावसाच्या प्रत्येक सरीवर,
ओल्याचिंब भिजणाऱ्या गिरीवर.
प्रेम कधीही करावं कुणावर..........

फुलांनी लदबदलेल्या झाडावर,
अन पारिजातकाच्या सड्यावर.
खळखळून वाहणाऱ्या ओढ्यावर,
समुद्रात पहुडलेल्या होड्यांवर.
प्रेम कधीही करावं कुणावर.............

कुणाच्या घामाच्या धारांवर,
कष्ट करणाऱ्या कास्तकारांवर.
उघड्या अबोल जखमांवर,
मनाला बोचणाऱ्या शब्दांवर.
प्रेम कधीही करावं कुणावर...............

तीच्या ओल्याचिंब पाऊलांवर,
अन मधाळ, रसाळ बोलांवर.
तीच्या डोळ्यांच्या हसण्यावर,
अन तिने पाहिलेल्या चंद्रावर.
प्रेम कधीही करावं कुणावर...............

तिच्या रांगोळीतल्या बोटांवर,
गालावर रेंगाळणाऱ्या बटांवर.
तिने माळलेल्या फुलांवर,
न रुचलेल्या बोलांवर.
प्रेम कधीही करावं कुणावर..............

तिच्या येणाऱ्या स्वप्नांवर,
हळूच निघणाऱ्या आठवांवर.
ती असतांना तिच्या असण्यावर,
ती नसतांना तिच्या नसण्यावर.
प्रेम कधीही करावं कुणावर,
बेछूट, बेफाम हृदयाच्या तालावर......
                .........अतुल धायडे

Tuesday, October 30, 2012

अंतर


अंतर
रात्रीचा दिवस अन
दिवसाची रात्र होतांना
क्षणांचे मिनीटे अन
मिनीटांचे तास होतांना,

  आठवण तुझी संपत नाही,
  प्रत्येक नवा श्वास घेतांना.  

      जागलेपणी झोपतांना नि
      झोपल्यावर सुद्धा जागतांना,
      सारखं उठून बसतांना नि
      कुशा नेहमी बदलतांना,
        आठवण तुझी संपत नाही,
        तराळलेले डोळे पुसतांना.

            दोघांनी स्वप्न बघतांना,
            तुझे घर माझ्या घरात असतांना,
            एकमेकांच्या बाहूपाशात अन
            रोमारोमात घुसतांना
             काहीच कसे वाटले नाही,
             माझा हात झटकून जातांना.

तुझं घर सावरतांना,
आपली पिल्लं सांभाळतांना,
माझं असं भरकटतांना अन
आयुष्याची धावाधाव करतांना,
  तुला मात्र बरं वाटत असेल,
  ढगांआडून बघतांना.
                        अतुल धायडे.   

Friday, December 9, 2011

जीवनाssss


                          जीवनाssss
       जीवनाss तुझं नि माझं,
      नेहमीच वाकडयं.
      तु निट चलावस म्ह्णून,
      देवाला माझं साकडयं.
     
            तो सुद्धा याबाबतीत
            ऐकत नाही माझं,
            आणि नेहमी
            खरं करतो तुझं.

      तुझ्या पासून पळायचं म्हटलं,
      तर पळता येत नाही.
      दोन हात करायचे,
      तर करता येत नाही.
                  तरीही.........

आता मी ठरवलय,
पुन्हा complaint करणार नाही.
तुझ्याबरोबर जगतांना,
मागे सरणार नाही.
      बघुया! जिंकता येतय काय?
      तसंही तुला हरविल्याशिवाय,
      मी मरणार नाही.

                                                अतुल धायडॆ.

Saturday, November 12, 2011

ऎलतीर पैलतीर





ऎलतीर पैलतीर,
झुंज तुझी आणिक नीर.  
स्तब्ध निमिष शांत क्षितीज
होडीच्या मध्यावर पाण्याचा झीर   
ऎलतीर पैलतीर
झुंज तुझी आणिक नीर

साहसाचे पायताण माझे
झीरावर दाबून
उभा मी पैलतीराला
नजरेत साधून
ऎलतीर पैलतीर झुंज
माझी आणिक नीर

आकाशाच्या गर्भात
काळेकुट्ट ढग
पाण्याची खोली जरा
मोजून तरी बघ
वादळ दारी, उंच गिरी
सुटेल तुझा धीर
ऎलतीर पैलतीर
झुंज तुझी आणिक नीर

पाण्याच्या खोलीची
तमा कुणला
काळ्याकुट्ट ढगांची
भिड कशाला
उत्साही वल्हे माझे
आणि ध्येयांचा धीर
ऎलतीर पैलतीर झुंज
माझी आणिक नीर

अथांग या जलधिला
रात्रीची कडा
क्षणार्धात जाईल
तुझ्या स्वप्नांना तडा
किर्रss  अंधार म्हणून सांभाळ   
जाईल तुझे शीर
ऎलतीर पैलतीर

झुंज तुझी आणिक नीर
शीर काय? शरीर काय?
पहाट आहे माझी माय
पुर्वेच्या प्रवासाला
मग भिण्याचे कारण काय?
अचूक हे ध्येय माझे
फक्त निघण्याचा उशीर
ऎलतीर पैलतीर
झुंज माझी आणिक नीर
   

अतूल धायडे
(‘स्वप्नपंख’ २०११ मध्ये पुर्व प्रकाशीत)

Thursday, October 6, 2011

दसर्‍याच्या मुहुर्तावर एक आपुलकीचे आवाहन.

     दसर्‍याच्या दिवशी आपण जी आपट्याची पाने वाटतो त्यामुळे आपण आपट्याच्या झाडांच्या र्‍हासाला कारणीभूत होत चाललोय. एकतर आपट्याच्या झाडाची वाढ होण्यासाठी चिंचेच्या झाडापेक्षाही जास्त कालावधी लागतो, जे लोक मुंबई आणि उपनगरांत आपट्याची पाने विक्रीसाठी आणतात ती अक्षरश: झाडे ओरबाडून कशीही तोडून आणतात. त्यामुळे काही झाडांची वाढ कायमची खुंटते तर काही झाडे वाळून जातात.
                                                   जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा जंगलात साठच्या दशकात आपट्याची झाडे हजारोंच्या घरात होती आता ती काहीशेच्या घरात आहे. आता महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी आपट्याचे मोठे झुपकेदार दाट झाडीचे वृक्ष आपणाला लवकर दिसत नाहीत, जी झाडे दिसतात ती खुरगटलेली आणि काहिशी निष्पर्ण दिसतात, त्यांच्यामधे तुम्ही साधी हॉकी स्टीक लपउ शकत नाही. मग कदाचित आपल्या पुढच्या पिढ्यांना ह्याच झाडात पांडवांनी शस्त्रे लपविली होती ही दंतकथा वाटेल किंवा हे झाडच दंतकथा होउन जाईल.
                                                                                                                                                     आपट्याची झाडे जास्त ठिकाणी उपलब्ध नसल्याने आपट्याच्या पानांची विक्री करणारे 'आंजण' ( Iron wood ) या वृक्षाची पाने आपट्याच्या पानांसारखीच दिसायला असल्याने त्या पानांची विक्री करतांना दिसून येतात. आंजणाच्या झाडाच्या लाकडाला जबरदस्त बळकटी असल्याने त्यांची बेकायदेशिर तोड होत असून त्यांना सुद्धा ग्रहण लागलेले आहे.

                                    विचार आपण करायचा आहे, आपल्या प्रेमात, आपुलकीत एवढी ताकद नक्कीच आहे की आपल्या सोन्यासारख्या भावना एकमेकांपर्यत सहज पोहचतील त्यासाठी आपट्याच्या पानांची गरज नक्कीच नाही.