Thursday, October 6, 2011

दसर्‍याच्या मुहुर्तावर एक आपुलकीचे आवाहन.

     दसर्‍याच्या दिवशी आपण जी आपट्याची पाने वाटतो त्यामुळे आपण आपट्याच्या झाडांच्या र्‍हासाला कारणीभूत होत चाललोय. एकतर आपट्याच्या झाडाची वाढ होण्यासाठी चिंचेच्या झाडापेक्षाही जास्त कालावधी लागतो, जे लोक मुंबई आणि उपनगरांत आपट्याची पाने विक्रीसाठी आणतात ती अक्षरश: झाडे ओरबाडून कशीही तोडून आणतात. त्यामुळे काही झाडांची वाढ कायमची खुंटते तर काही झाडे वाळून जातात.
                                                   जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा जंगलात साठच्या दशकात आपट्याची झाडे हजारोंच्या घरात होती आता ती काहीशेच्या घरात आहे. आता महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी आपट्याचे मोठे झुपकेदार दाट झाडीचे वृक्ष आपणाला लवकर दिसत नाहीत, जी झाडे दिसतात ती खुरगटलेली आणि काहिशी निष्पर्ण दिसतात, त्यांच्यामधे तुम्ही साधी हॉकी स्टीक लपउ शकत नाही. मग कदाचित आपल्या पुढच्या पिढ्यांना ह्याच झाडात पांडवांनी शस्त्रे लपविली होती ही दंतकथा वाटेल किंवा हे झाडच दंतकथा होउन जाईल.
                                                                                                                                                     आपट्याची झाडे जास्त ठिकाणी उपलब्ध नसल्याने आपट्याच्या पानांची विक्री करणारे 'आंजण' ( Iron wood ) या वृक्षाची पाने आपट्याच्या पानांसारखीच दिसायला असल्याने त्या पानांची विक्री करतांना दिसून येतात. आंजणाच्या झाडाच्या लाकडाला जबरदस्त बळकटी असल्याने त्यांची बेकायदेशिर तोड होत असून त्यांना सुद्धा ग्रहण लागलेले आहे.

                                    विचार आपण करायचा आहे, आपल्या प्रेमात, आपुलकीत एवढी ताकद नक्कीच आहे की आपल्या सोन्यासारख्या भावना एकमेकांपर्यत सहज पोहचतील त्यासाठी आपट्याच्या पानांची गरज नक्कीच नाही.                        

1 comment:

  1. नमस्कार, दसर्‍याच्या हार्दीक शुभेच्छा...!
    आता तरी ही प्रथा बंद करायला हवीच. पुर्वीच्या काळी वेगळं होतं. पण आता सगळं उजाड होत असताना आणखी अशा प्रकारे होणारा र्‍हास थांबवलाच पाहिजे. फुलं सुद्धा झाडांवरच छान वाटतात. ती आणायची आणि निर्माल्य खाडीत,नद्यात,समुद्रात टाकायचं म्हणजे पर्यावरणाची हानीच आहे. दसर्‍याच्या दिवशी विचारांचं सिमोलंघन केल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete